कारसेवा :- ‘ एक अविस्मरणीय अनुभव ‘

1 min read

Opinion

कारसेवा :- एक अविस्मरणीय अनुभव ‘ 

सर्व हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या नगरीतील जन्मस्थानावर परकीय आक्रमक बाबराने सुमारे ५०० वर्षांपूर्वी मंदिर पाडून त्याठिकाणी मशीद बांधली होती.

त्यानंतर श्रीराम जन्म भूमी मुक्तीसाठी अनेकवेळा आंदोलन व लढाया झाल्या आणि त्यासाठी लाखो    हिंदूंनी प्राणांची आहुती दिली, परंतु रामजन्मभूमी मुक्त करण्यात कोणालाही यश मिळाले नाही.

१९९० साली रामजन्मभूमी मुक्तीसाठी विश्व हिंदू परिषदेने ३०-३१ ऑ्टोबर रोजी आयोध्येत कारसेवेचे आंदोलन उभे केले. त्याच वेळी या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी सोरटी सोमनाथ ते  आयोध्या अशी रथयात्रा काढली. सदर यात्रा सोलापूरात आल्यावर मी कारसेवेसाठी जाण्याचा निश्चय केला.

घरातील वातावरण हे हिंदुत्ववादी असल्यामुळे आईने कारसेवेला जाण्यास परवानगी दिली.

दिनाक २५ ऑक्टोबर रोजी मी व  माझे २० हिंदुत्ववादी मित्र कारसेवेसाठी जाण्यास निघालो . आमच्या बरोबर सोलापुरातील संघ परिवारातील जवळपास ४००-५०० कारसेवक सुद्धा  होते .. जय श्रीराम व रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे अश्या घोषणा देत प्रयाग राजला कधी पोचलो हे कळलेच नाही. आयोध्येस जाण्यासाठी सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता.

त्यावेळी उत्तरप्रदेश मध्ये मुलायम सिंग यांचे सरकार होते . त्यांनी आयोध्ये मध्ये पक्षी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही असा बंदोबस्त केला होता. उत्तरप्रदेश मध्ये देशभरातून येणाऱ्या कारसेवकांचा छळ करून त्यांना कारागृहात ठेवण्यात येत होते.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी जवळपास ५०००० कार सेवकांनी प्रयागराज येथून आयोध्ये कडे जाण्यासाठी कुच केले , परंतु मुलायम सरकारने तेथील एका नदीच्या पुलावर कारसेवक आले असता अचानक लाठीमार व गोळीबार सुरू केला . त्यामध्ये अनेक कारसेवक जखमी झाले. आम्हा सर्वांना अटक करून तेथील एका शाळेत बंदिस्त केले. तेव्हा माझ्या मनात आले की आता आयोध्येत जाणे कठीण आहे. परंतु विश्व हिंदू परिषदेचे श्री. भुजंगराव घुगे यांच्यासह आम्ही ५०-६० कारसेवकांनी पोलीसांच्या न कळत शाळेच्या कंपाऊंड वरून उड्या मारून रात्री १०-११ च्या सुमारास आयोध्येकडे जाण्यासाठी पायी निघालो.

स्टेशनवरून एका रेल्वेत बसून आम्ही अयोध्येकडे कुच केले परंतु २५-३० किमी. गेल्यावर फाफामाऊ  रेल्वे स्थानकावर गाडी अडवली व गाडी पुढं जाणार नाही असे सांगितले व अटक सत्र सुरू केले. परंतू पोलिसांचे संख्या बळ कमी असल्याने ते सर्व राम भक्तांना अटक करू शकले नाहीत याचा फायदा घेऊन श्री. भुजंगरावांनी आम्हाला बरोबर घेऊन आयोध्येकडे पायी कुच केले . त्यांनी आम्हाला तेथून आयोध्या १४५ किमी. दूर असल्याचे सांगितले व आपल्याला मुख्य मार्गाने न जाता रानावनातून जायचे आहे असे सूचित केले. परंतु आमच्या मनात रामाने संचार केलेला असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्यास होकार दिला व रात्री १२ च्या सुमारास पायी निघालो. आयोध्येसाठी जाणारा मार्ग कळावा म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी दिशा दर्शित करणारे फलक लावले होते तसेच गावागावांमधून गावकरी जेवणाचे पाकीट देत होते व जय श्रीराम चा घोषणा देत आमचा उत्साह वाढवत होते . पुढे काही अंतरावर आम्हाला मध्यप्रदेश व बिहार मधील ७०-८० कार सेवक येऊन मिळाले..त्यामुळे तर आमच्या उत्साह द्विगुणित झाला. मनात रामनमाचे स्मरण करत आम्ही आयोध्येच्या दिशेने वाटचाल करत होतो. एके ठिकाणी जवळपास पिंढ-यांपर्यंत चिखलामधून चालत जावे लागले त्यामुळे सर्वांच्या चपला रुतून बसल्या व आम्हाला पुढे अनवाणी जावे लागले. एकेठिकाणी तर डोक्यावर पिशवी घेऊन छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून जावे लागले. काही ठिकणी पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे जे ठिकाण ५ किमी. अंतरावर आहे त्याठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला आड मार्गाने गेल्याने १०-१२ किमी. चालत जावे लागले. परंतु रामाला भेटण्याची ओढ असल्याने आम्हाला त्याचा काही त्रास होत नव्हता. आयोध्या१० किमी. वर राहिली असता आम्हाला रात्री पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून रेल्वे रुळावरून चालत जावे लागले. दिनाक ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास आम्हीआयोध्येत दाखल झालो. तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्या पवित्र भुमिस नमस्कार केला. त्याच दिवशी कारसेवेचे आयोजन असल्यामुळे आयोध्येच्या गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने कार सेवकांनी राम जन्मभूमी कडे जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिथरलेल्या पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार , अश्रुधुरचा वापर केला. असे असून देखील काही बहादर कारसेवकांनी बाबरी मशिदीवर चढून भगवा ध्वज फडकवला ..त्यामुळे पोलिस अधिकच चवताळले व त्यांनी रामभक्तांवर अमानवीय असे अत्याचार केले. यामध्ये कित्येक रामभक्त शहीद झाले.      त्यानंतर दिनांक  १ नोव्हेंबर रोजी बाबरी मशिदीवर भगवा ध्वज फडकवणाऱ्या कोठारी बंधूंना पोलिसांनी ठार मारले. त्याच्या निषेधार्थ  मा. उमा भारती यांच्या नेतृत्वात रामभक्तानी मोठ्या संख्येने रामजन्मभूमीकडे कूच केलं. त्यावेळी पोलिसांनी रामभक्ताना अटक करून नेण्यासाठी १००-१५० बसेस मागवल्या होत्या. तरीही राम भक्तांनी त्यांना जुमानले नाही व बस पेटवून दिल्या . पुढून पोलिसांनी गोळीबार सुरू केले व शेकडो रामभक्त धारातीर्थी पडू लागले. मा. उमा भारती यांना अटक करण्यात आली. राम भक्तांचे नाहक बळी जाऊ नयेत म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सर्वांना आपापल्या छावणीमध्ये जाण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या बरोबर सोलापुरातील श्री.विजय पुकाळे, अँड. चंदकांत मोकाशी , अनंत अंजिखाने, प्रल्हाद कट्टी , अनंत दुदगिकर , अनिल कल्याणशेट्टी ई. कारसेवक होते. वाटेत माणिराम छावणी समोर पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या राम भक्ताच्या मृतदेहाचा पडलेला खच बघून मन विषण्ण झाले व रामजन्मभूमी मुक्त करण्यात अपयश आल्याने आम्ही निराश होऊन सोलापुरात परतलो.

दुसऱ्या कार सेवेच्या वेळेस मला नुकतीच नोकरी लागल्यामुळे मी कार सेवेत भाग घेऊ शकलो नाही हे मी माझे दुर्दैव समज तो .. कारण त्यावेळेस रामभक्तानी ५०० वर्षांपूर्वीचा असलेला कलंक पुसून काढून रामलल्लाची  जन्मभूमी मुक्त केली.पण या ऐतिहसिक क्षणात माझ्या आई व बहिणीने सहभाग नोंदवला याचा मला फार आनंद झाला..

त्यानंतर गेली २८ वर्षे रोज आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहते का नाही अशी शंका मनात यायची परंतु उद्याच्या राम मंदिराचा भूमिपूजनाचा क्षण जवळ आल्याने जीवनाचे सार्थक झाले असे वाटते.

श्री रामजन्मभूमी मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या लाखो राम भक्तांचे आत्मे हे उद्या ख-या अर्थाने संतुष्ट होतील.

जय श्री राम…….

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *