महारामायण-अर्थात योगवाशिष्ठ लेखिका रामा दत्तात्रय गर्गे

1 min read

Opinion

महारामायण-अर्थात योगवाशिष्ठ   लेखिका रामा दत्तात्रय गर्गे

वसिष्ठांनी रचलेला आणि वाल्मिकींनी संकलित केलेला २७ हजार ६८७ श्लोकांचा महाग्रंथ म्हणजेच योगवाशिष्ठ होय! या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अद्वैत वेदांताचा “सिद्धांत ग्रंथ” मानला जातो.

उपनयन संस्कारानंतर श्रीराम गुरुकुलात जातात,तेथे १२ वर्षे शिक्षण घेतात आणि तेथून तीर्थयात्रा करत करत परत एकदा अयोध्येमध्ये येतात।त्यावेळी त्यांना पूर्ण विरक्ती आलेली असते ।राजवैभव आशा-आकांक्षा आणि देह या सगळ्यांचा  काळ नाश करणार आहे,मग असे असताना यांचा उपभोग  मी कशासाठी घ्यावा,असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात।

विश्वामित्र त्याच दरम्यान राम आणि लक्ष्मण यांना नेण्यासाठी आलेले असतात। रामाच्या मनातील सर्व विचारांचा अंदाज आल्यानंतर वशिष्ठ मुनींशी विश्वामित्र चर्चा करतात।

मग या गुरू-शिष्याच्या म्हणजेच राम आणि वशिष्ठांच्या चर्चेमधून हा भव्य दिव्य मोक्ष-सिद्धांत ग्रंथ आकाराला येतो.

यामध्ये सहा प्रकरणे आहेत .पहिले वैराग्य प्रकरण ज्यामध्ये श्रीरामाला विरक्ती कशी आली याचे वर्णन आहे। दुसरा दुसरे प्रकरण मुमुक्षु व्यवहार। मोक्षप्राप्ती इच्छिणाऱ्या व्यक्तीने संसारात कसे वागावे ,कर्तव्याने कसे रहावे या संदर्भातील सर्व माहिती या प्रकरणामध्ये आहे।त्यानंतर तिसरे चौथे आणि पाचवे प्रकरण जगाच्या उत्पत्ती-स्थिती आणि लयाची माहिती देतात। यामध्ये अनेक उपाख्याने आली आहेत। विविध प्रकारचे दृष्टांत आणि अनेक उदाहरणांनी भरलेली ही प्रकरणे साधकाला जगताच्या अस्तित्वाची नीट माहिती करून देतात। त्यानंतरचे प्रकरण म्हणजे निर्वाण प्रकरण होय। संसार चक्रात अडकलेल्या जीवात्म्याला मुक्ती कशी मिळते, कर्ता कर्म करीत असताना द्रष्टा कसा आकाराला येऊ शकतो,स्वतःच्या कर्मांना साक्षीभावाने बघायचे म्हणजे काय – या सर्व गोष्टींची चर्चा या प्रकरणामध्ये केलेली आहे. यामध्येच अध्यात्मिक क्षेत्रात गाजलेली ‘भृशुंडीकाक’ याची देखील कथा आलेली आहे।

या प्रकरणात ‘अविद्या लता’ कशी आकाराला येते हे वशिष्ठ सांगतात। ‘चेतनेच्या पर्वतावर अविद्या रुपी वेल चढते। सुख दुःख भाव अभाव आणि अज्ञान हिची पाने फुले आणि फळे असतात। ही वेल कधी दुःखस्वरूपा असते तर कधी सुखस्वरूपा असते।

दिवस ही जणू अविद्येची फुले असतात तर सगळ्या रात्री या त्या फुलांवरील भ्रमराप्रमाणे असतात। ही वेल भोगाच्या रसावर पुष्ट होत जाते।’

 

श्रीराम विचारतात गुरूवर्य, “या अविद्येचा नाश कसा करायचा?”

वशिष्ठ म्हणतात,” रामा, एका अविद्येची दोन रुपे आहेत।एक अविद्या विद्यारूप असते। जसे बिजा मधून फळ मिळावे आणि फळाने परत बीजरूप व्हावे,तशी।किंवा जसे पाण्यातून पाण्याचा बुडबुडा उठावा तसेच अविद्येतून विद्या उपजते आणि त्या विद्येनेच अविद्येचा लय होतो। जसे काष्ठामध्ये अग्नी विद्यमान असतो।लाकूड पेटवले गेले की आतील अग्निनेच काष्ठ दग्ध होते। त्याप्रमाणे विद्या अविद्येतून जन्म घेऊन  अविद्येचा नाश करते।”

त्यावर श्रीराम  विचारतात ,” आपण जीवनमुक्त पुरुष  बघतो  ते संसारातून निवृत्त झालेले असतात.मग संसारातून निवृत्त न होता बोधाच्या मार्गावर कसे चालायचे?”

वशिष्ठ म्हणतात,”श्रीरामा या बोधाच्या निमित्ताने मी तुला वारंवार सांगू इच्छितो की आत्मसाक्षात्कार हा भावाच्या अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही.अज्ञान आणि अविद्या अनंत काळापासून आपल्यामध्ये दृढमूल झालेले असता. इंद्रियांच्या माध्यमातून ते सशक्त होत जातात.  या इंद्रियांना आत्म्याची जाणीवच होऊ शकत नाही.म्हणूनच जेव्हा मनासहित सर्व इंद्रियांचा अभाव निर्माण होतो,तेव्हाच शांती निर्माण होते। आणि त्यातूनच मग जीवनमुक्त अवस्था ही संसारात असतानादेखील आपल्याला अनुभवता येते।”

योगवाशिष्ठ  हा ग्रंथ  चित्त शांत करणारा ग्रंथ आहे। आपण कितीही योग्यता घेऊन जन्मलो असलो, आपल्यामध्ये कितीही गुण असले तरीही आपण कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घेतो यावरूनच आपला खरेपणा सिद्ध होतो। योगवाशिष्ट वाचल्यानंतर, त्याचे अध्ययन केल्यानंतर अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी मनुष्याला ‘आत्मबल’ प्राप्त होते. योगवाशिष्ठाच्या अध्ययनाने चित्त शांत होते. शांत चित्तात संकल्प विकल्प आदींची शृंखला हळूहळू कमी कमी होत जाते। अध्यात्मिक शक्तींचा विकास होतो। संसारीक कार्ये सहजपणे होऊन जातात।त्यात सफलता किंवा विफलता जरी आली तरी तुम्ही अहंकारी किंवा क्रोधाविष्ट होत नाही।

वशिष्ठांच्या उपदेशाने घडलेला हा सत्शिष्य राम आपल्याला पुढच्या सगळ्या रामायणामध्ये दिसतो।

राम कधी रागावला नाही। त्याने कुणाचा तिरस्कार केला नाही।त्याने कधीही संयम सोडला नाही।तो सतत संतुलित राहीला। अंगिकारलेल्या सिद्धांताचा, मूल्यांचा त्याने कधीही त्याग केला नाही। अनेक अनेक वाईट प्रसंगांमध्ये राम स्थिरचित्त राहिला।

 

म्हणूनच रामाची कथा प्रत्येक युगात सांगितले जाते।ही कथा आपल्याला शांतीकडे नेते। रामायणाचा अंगिरस हा शांतरस आहे। रामाकडून आत्मारामाकडे होणारा प्रवास म्हणजे ही कथा आणि या आत्मारामाचा पहिला मुक्काम होतो  “महारामायण योगवाशिष्ठात!”

दैहिक रामाकडून निराकार बीजमंत्राकडे नेणारा हा ग्रंथ!अद्वैत वेदांतामध्ये हा सिद्धांत ग्रंथ म्हणून अत्यंत श्रद्धेने अभ्यासला जातो।

।। श्रीराम जय राम जय जय राम।।

लेखिका : रमा दत्तात्रय गर्गे।

====  ++  ====

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *